मुरघास पध्दत

मका,ज्वारी,बाजरी,ओट, यशवंत, जयवंत, गिनी इत्यादी एकदल वैरण पिकांत कार्बोदके (पिष्टमय पदार्थ) व शर्कराचे प्रमाण जास्त असते. त्या तुलनेत व्दिदल वैरण पिकात प्रथिने (प्रोटीन) जास्त प्रमाणांत असतात. उत्तम प्रतीच्या मुरघास तयार करण्यासाठी कार्बोदकांचे जास्त प्रमाण असलेली वैरण पिके योग्य ठरतात. तसेच एकदल व व्दिदल वैरण पिकांचे मिश्रण 70:30 या प्रमाणात घेण्यांत येऊन देखिल चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करता येऊ शकतो.

 • 1. कापणी केलेल्या वैरण पिकांचे कडबाकुट्टी यंत्राचे सहाय्याने 4 ते 5 सें.मी.आकाराचे तुकडे करण्यात यावेत.
 • 2. कुट्टी केलेली वैरण खड्डयांत 1 ते 2 फूटाचा थर करुन पसरुन त्यावर रोलर फिरवून अथवा माणसांकडून जास्तीत जास्त दाब देण्यात यावा. यामुळे पोकळी राहणार नाही व थरातील हवा निघून जाईल.
 • 3. एका घनफूट आकार जागेत कुट्टी केलेली वैरण 15 ते 18 किलो तर एका घनमीटर आकार जागेत कुट्टी केलेली वैरण 650 ते 700 किलो साठविता येते.
 • 4. एका टनासाठी (10 क्विंटलसाठी) 1 किलो साधे मीठ स्फटीक स्वरुपातील (खडे असलेले) टाकावे. मीठामुळे वैरण टिकण्यास मदत होते.
 • 5. एका टनासाठी 10 लिटर मोलासीस(मळी) शिंपडावी. मळी उपलब्ध नसेल, तर दहा लिटर पाण्यात 1 किलो साधा गुळ विरघळून द्रावण करुन, वैरणीवर शिंपडावे. यामुळे वैरणीची चव वाढण्यास मदत होते.
 • 6. चा-याचे पीक फुलो-यात आल्यानंतर ते चिकात असताना अथवा दाणे भरण्यास सुरुवात झाल्याबरोबर पिकाची कापणी करावी.
 • 7. कापलेल्या हिरव्या चा-याच्या कडबा कुट्टी यंत्राच्या सहाय्याने कुट्टी करावी.
 • 8. मुरघास टाके हा साफ व कोरडा करुन घेण्यांत यावा. भिंतीना भेगा अथवा छिद्र असल्यास ती बुझविण्यांत यावीत. मूरघास टाके भरताना विशेष काळजी घेण्यात यावी. मूरघास टाक्याच्या तोंडाचा उपयोग, हा हिरवी कडबाकुट्टी भरताना व मूरघास काढताना होतो.मूरघास भरताना तो सर्वबाजूनी हवाबंद होईल याची काळजी घ्यावी. मूरघास टाक्याच्या तळामध्ये 5 फूट रूंद व 15 फूट लांबीचे पॉलीथीन शीट टाकावे. पॉलीथीन शीट टाकताना तळामध्ये 4 ते 5 फूट व उर्वरीत 10 ते 11 फूट हे टाक्याच्या 4 फूट रूंदीच्या तोंडाकडे मोकळे सोडण्यात यावे. हिरव्या चाऱ्याच्या कडबाकुट्टीचा एकावरएक थर रचताना पॉलीथीन शीटमूळे 4 फूट रूंद तोंडाकडील भाग झाकण्यात यावा पॉलीथीन शीट व तोंडाकडील 4 ते 6 इंच खाचामध्ये लाकडी फळी किंवा पत्रा बसविण्यात यावा. यामूळे समोरील तोंड हे हवाबंद होईल. प्रत्येक थराच्या वेळेस पॉलीथीन शीट व लाकडी फळी / पत्रा यांची व्यवस्थितपणे रचना / बांधणी करण्यात यावी. मूरघास टाके बांधकामाची व मूरघास तयार करण्याची CD पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आली असून त्याचे बारकाईने निरीक्षण करून कार्यवाही करावी व त्यानुसार बांधकाम करावे आणि मुरघास टाके भरावे.
 • 9. मूरघास टाके भरताना सुरुवातीस वाळलेले गवत, पालापाचोळा यांचा एक थर (4 ते 6 सें.मी.) भरण्यात यावा.
 • 10. नंतर कापलेल्या हिरव्या चा-याच्या कुट्टीने मूरघास टाके एक फूटापर्यन्त भरण्यात यावा व सदरची हिरव्या चा-याची कुट्टी टाक्यामध्ये माणसाकडून/धुमसच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे दाबण्यात यावी. जेणेकरुन कुट्टीमधील सर्व हवा बाहेर पडेल.
 • 11. आवश्यक वाटल्यास यानंतर एक मेट्रीक टन हिरव्या चा-यास एक किलो खडे मीठ टाकण्यात यावे.
 • 12. यानंतर अशाच प्रकारे एक फूटाचा दुसरा थर भरण्यास येऊन तो सुध्दा उत्तमप्रकारे दाबण्यात यावा.
 • 13. अशा प्रकारे, एका-एका फुटाचे एकावर एक थर भरण्यात येऊन टाके पूर्णपणे भरावे व हौदातील हिरव्या वैरणीची कुट्टी चांगल्या प्रकारे दाबण्यात यावी. त्यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
 • 14. मूरघास टाके भरण्याची प्रक्रिया जास्तीत जास्त 48 तासांत पुर्ण करावी.टाके पूर्ण भरल्यानंतर वाळलेले गवत, उसाचे पाचट, भाताचे फोलकट, गव्हाचे काड अथवा भुस्सा याचा एक थर देण्यात यावा. तसेच त्यावर 10 फूट x 10 फूट पॉलिथिन कापडाने झाकण्यात येऊन त्यानंतरही पॉलिथिन कापडावर वरील प्रकारे एक थर देण्यात येऊन, तो पूर्णपणे शेणामातीने लिपून घेण्यात यावा. यामुळे बाहेरील हवा आंत जाणार नाही व टाके पूर्णपणे हवाबंद होईल. तसेच टाक्यामध्ये पावसाचे पाणी जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
 • 15. अधून-मधून मुरघास युनिटचे व्यवस्थित निरीक्षण करावे. भेगा, चिरा आढळल्यास त्या बंद कराव्यात. मुरघासामध्ये हवा व पाणी पाझरत नाही याबाबतची खात्री करावी.
 • 16. मुरघास तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 45 दिवसांचा कालावधी लागतो. तयार झालेला मुरघास 1 ते 2 वर्षापर्यन्त साठवून ठेवता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *